जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांचा जागतिक बँक सहाय्यित यादीत समावेश करा, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जालना/प्रतिनीधी,दि.5
जालना शहर सुधारीत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना व सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेचा समावेश जागतिक बँक सहाय्यित यादीमध्ये समावेश करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायणराव कुचे, आ.संतोष पाटील दानवे,माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे जालना शहर व जिल्ह्यातील विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जालना शहर हे स्टिल उत्पादनाचे मोठे औद्योगिक शहर असून, शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यातच जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास आवश्यक त्या प्रमाणात पायाभूत सुविधा शहरास उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून देत माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी शहरातील भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. जालना शहराची ४ लाख २५ हजार इतकी लोकसंख्या ग्राह्य धरुन जायकवाडी योजना तयार करण्यात आली असून सदर योजनेद्वारे सध्या जालना शहरा करीता पाण्याची मागणी ही ६० MLD इतकी आवश्यक आहे व सदर योजनमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र अनुक्रमे ३५ MLD व १५ MLD नव्याने उभारणी करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. सदर योजना लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असली तरी जालना शहराची व्याप्ती झपाट्याने वाढत असून नव्याने वाड्या-वस्त्या विकसीत होत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता सन २०४५ साली शहराची लोकसंख्या ५ लक्ष इतकी होण्याची शक्यता असून, त्यावेळची पाणी मागणी ७५ MLD इतकी असू शकते व सन २०६० साली ६ लाख इतकी लोकसंख्या असू शकते, त्यामुळे २०४५ साली शहराची पाणी मागणी वाढून ७५ MLD इतकी होऊ शकते. त्यामुळे पुढील काही वर्षातच शहरातील पाणी प्रश्न पुन्हा बिकट होऊ शकतो. त्यामुळे पुढील ३० वर्षाची लोकसंख्या व पाणी मागणी विचारात घेऊन जालना शहरास नवीन पाणी पुरवठा योजना टप्पा – राबविण्याची मागणी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केली आहे. जालना शहरामध्ये मध्ये वापरात येणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरीता अमृत १ अभियाना अंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्र. १ मध्ये ५० द.ल.लि. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचं काम सुरू असून, त्यामध्ये नाला वळवणे, मलशुद्धीकरण केंद्र बांधणे इतक्याच उपांगांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या शहरातील सांडपाणी हे उघड्या गटारातून वाहत असून, मुख्य नाल्यांना मिळालेलं असल्याने शहरात रोगराई व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच सध्याची लोकसंख्या ग्राह्य धरून पूढील काही वर्षांत असणाऱ्या पाणी मागणीनुसार ७५ MLD पाणी व त्यातून उत्पन्न होणारे सरासरी ६५ MLD सांडपाणी शुद्धीकरणासाठी टप्पा क्र. १ मध्ये उभारलेल्या ५० MLD मलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त १५ MID मलशुद्धीकरण केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे या निवेदनात गोरंटयाल यांनी नमूद केले आहे. तसेच संपूर्ण शहरात कलेक्शन सिस्टम पाईप अंथरूण बंदिस्त पाईपद्वारे सांडपाणी मलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. त्यामुळे जालना शहराकरिता टप्पा क्र. २ अंतर्गत अतिरिक्त १५ MLD मलशुद्धीकरण केंद्र उभारणे व संपूर्ण शहरात कलेक्शन सिस्टम योजना राबवणे गरजेचे आहे. तसेच जालना शहरात मोठ्या प्रमाणात स्टील उत्पादन प्रकल्प असल्या कारणाने सदर कारखानदारांना स्टील आयात व इतर उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे त्यांनी पाण्याची मागणी महानगरपालिकेकडे केलेली आहे. त्याकरीता सांडपाणी प्रकल्पातून उत्पन्न होणाऱ्या पाण्यावर Tertiary treatment करून सदर पाणी पुनर्वापरात आणण्यासाठी Tertiary treatment प्रकल्प उभारणी करणे सुद्धा आवश्यक आहे. जालना शहरास स्वच्छ व निरोगी बनविण्यासाठी आपल्या सहकार्याने सूधारीत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना व सांडपाणो व्यवस्थापन व पुनर्वापर योजना (Tertiary treatment) या सर्व योजनांचा जागतिक बैंक अर्थ सहाय्य योजनेत समावेश करून या तिन्ही योजनांना प्रशासकीय मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जालना शहरासाठी पाणी पुरवठा टप्पा – २ योजना राबवा —जालना शहरासाठी सध्या कार्यान्वित असलेली जायकवाडी – जालना ही योजना ४ लाख २५ हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून मंजूर करण्यात आलेली आहे.मात्र, भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन आणि जालना शहरातील जनतेला पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी जालना शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना टप्पा – २ राबवावी अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
———————————————————–
सर्वेक्षणासाठी पथक लवकरच जालन्यात येणार – गोरंटयाल ————————————— जालना शहर सुधारित पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना,सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनांचा जागतिक बँक सहाय्यित यादीत समावेश करण्याबरोबरच शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना टप्पा -२ या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व बाबतीत सर्वेक्षण करण्यासाठी जालन्यात लवकरच तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात येईल अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल सांगितले.




