pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालन्यात 3 नोव्हेंबरला “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियान अभियानाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी  – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि. 26

दिव्यांग कल्याण विभागाचा 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.  जालना येथील पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान या अभियानाचे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांच्या प्रमुख  उपस्थित दिव्यांग अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. तसेच  अभियानाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियानाच्या नियोजनासाठी बुधवारी (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्योती राठोड, यांच्यासह मनपा, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध महामंडळांचे व्यवस्थापक, गट विकास अधिकारी उपस्थित होते.
जालना येथे 3 नोव्हेंबर रोजी आयोजित अभियानात महसुल विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिव्यांग वित्त विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महानगरपालिका, नगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, व इतर 40 शासकीय कार्यालयांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
तसेच अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी माहिती देवून अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. यासोबतच विविध दाखल्यांची नोंदणी तसेच युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय महामंडळे आणि शासकीय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करावे. दिव्यांगांना कुठलीही अडचण जाणवणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की,  संबंधित विभागप्रमुखांनी कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांगांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी दिव्यांगांसाठी नोंदणीची व्यवस्था, जेवन/चहापान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून  हे अभियान  यशस्वी करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.
या अभियानामध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.  जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस परेड ग्राउंड सर्वे क्र. 488, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे