pub-7425537887339079
ब्रेकिंग

मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त  जे एस पटेल व उरण परवाना  आधिकारी सुरेश बागुलगावे या अधिकाऱ्यांनी उरण दिघोडे येथील घटनास्थळी भेट देऊन केली नुकसानाची पाहणी

नुकसान भरपाईची मच्छिमार बांधवांची मागणी.

0 5 4 9 5 8
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
प्लॅटिनम वेअर हाऊस मधील स्फ़ोटामुळे उरण तालुक्यातील दिघोडे गाव चर्चेत आले आहे. मात्र मच्छिमार बांधव अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.दिघोडे हे उरण तालुक्यातील एक सुंदर आणि एकेकाळी अत्यंत समृद्ध गाव म्हणून ओळखले जात असे. असे म्हटले जाते की, पूर्वी या गावातून “सोन्याचा धूर” निघत असे, आणि त्यामागील प्रमुख कारण म्हणजे या गावातील मोठ्या प्रमाणावर असलेला कोळी समाज.
त्या काळात दिघोडे गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोळी बांधवांवर अवलंबून होती. मोठ्या यांत्रिक होड्यांच्या साहाय्याने हे कोळी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करत असत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्राशी दोन हात करणाऱ्या या मेहनती कोळी बांधवांना त्या काळात भरघोस उत्पन्नही मिळत असे.
मात्र, कालांतराने परिस्थिती बदलत गेली. मासेमारी व्यवसायात परप्रांतीयांचा प्रवेश झाला, तसेच नैसर्गिक परिस्थितीतही बदल घडू लागले. सन १९८९ मधील भीषण वादळाने दिघोडे गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक कर्ते, तरुण आणि आशादायी पुरुष आपल्या बोटींसह समुद्रात कायमचे विलीन झाले. दुसरीकडे, परप्रांतीयांच्या आधुनिक नौका आणि तंत्रज्ञानाच्या तुलनेत गावातील पारंपरिक नौका मागे पडू लागल्या.
हळूहळू मासेमारी व्यवसायातील परिस्थिती बदलली आणि त्याचबरोबर दिघोडे गावातील कोळी समाजाची आर्थिक स्थितीही खालावू लागली. एकेकाळी राजासारखे जीवन जगणारा हा कोळी बांधव आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लहान प्रमाणातील मासेमारीकडे वळला. गावातील खाडी, अर्थात “बैलोंडा खार”, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनली.
मात्र, अलीकडे या खाडीत सोडण्यात आलेल्या रासायनिकयुक्त पाण्यामुळे लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला असून, हजारो कोळी बांधवांच्या उपजीविकेवर गंभीर संकट ओढवले आहे. अलीकडेच प्लॅटिनम वेअरहाऊसमध्ये लागलेल्या आगीमधून निर्माण झालेले रासायनिकयुक्त पाणी या खाडीत सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कदाचित संबंधित वेअरहाऊस मालकांना याची जाणीव नसावी, परंतु त्यांनी हे रासायनिकयुक्त पाणी केवळ खाडीतच नव्हे तर त्या खाडीवर अवलंबून असलेल्या हजारो कोळी बांधवांच्या ताटातही मिसळल्यासारखे झाले आहे.
या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील,पंचायत समिती सदस्या प्रियांका दिपक मढवी यांनी मच्छिमार बांधवाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु केला.दिघोडे गावातील कार्यरत मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक कोळी,मदन कोळी ,गजानन कोळी,मच्छिंद्र कोळी ,सुभाष कोळी ,आणि इतर ग्रामस्थ,आणि गावचे सरपंच शकीर्तिनिधी ठाकूर,उपसरपंच अपेक्षा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी तात्काळ  तहसीलदार, उरण यांना लेखी निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त  जे एस पटेल व उरण परवाना  आधिकारी सुरेश बागुलगावे अलीबाग येथील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली आहे.
आता या गंभीर घटनेची दखल घेऊन शासन या हजारो कुटुंबांच्या नुकसानभरपाईसाठी ठोस पावले उचलणार का, की संबंधित वेअरहाऊस मालकांना अभय देत ही घटना केवळ सर्वेक्षणे आणि प्रशासकीय पाठपुराव्यातच अडकून राहणार, हे येणारा काळच ठरवेल.ही केवळ माशांची हानी नसून, हजारो कोळी कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर, संस्कृतीवर आणि अस्तित्वावर झालेला आघात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 9 5 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे