टेंभुर्णी परिसरात शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीबाबत बांधावर मार्गदर्शन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.9
टेंभुर्णी परिसरातील कुंभारझरी कृषी मंडळात सध्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खरीप पेरणीबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जात आहे. कुंभारझरीचे कृषी सहायक अधिकारी विजय गायकवाड यांनी सोमवारी कुंभारझरी व परिसरात शेतकऱ्यांना खरीप पेरणीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, शंभर मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. यावर्षी तापमान अधिक असल्याने शेतकऱ्यांनी धूळपेरणीचा जुगार खेळू नये, असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहेत त्यांनी ठिबक
सिंचनवर कपाशी व सोयाबीनची लागवड करावी, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर खरीप पेरणीचे नियोजन करून त्यानुसार पिकाला द्यावयाच्या खते व औषधी यांचे नियोजन अगोदरच करून ठेवावे, असेही ते म्हणाले. परिसरात यावर्षी अनेक शेतकरी पारंपरिक पिकांसोबत अद्रक व हळद या पिकांनाही विशेष महत्त्व देत आहे. सध्या अनेक शेतातून अद्रक व हळदीची लागवड सुरू आहेत. या पिकांची लागवड व घ्यावयाची काळजी याबाबतही गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी शेतकऱ्यांना केले. करावी.




