वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत समृद्धी गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
जाफ्राबाद तालुक्यातील नादखेडा येथील कु. समृद्धी दिलीप गायकवाड हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत तिचे वडील तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी नादखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नादखेडा गावचे सरपंच बाबासाहेब सवडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच बाबासाहेब सवडे यांनी वाढदिवस साजरा करण्याच्या बदलत्या पद्धतीवर भाष्य करत, “वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्या निधीतून मुलांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य, पुस्तके किंवा समाजोपयोगी वस्तू खरेदी कराव्यात. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो,” असे आवाहन केले. दिलीप गायकवाड यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, अशा सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा इतरांनीही घ्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.




