विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने गुरूवारी जालना जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. मराठवाडा शिक्षक संघाचे जालना जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे,सचिव संजय येळवंते डॉ. मारोती तेगमपुरे, ज्ञानोबा वरवट्ठे आदींच्या नेतृत्वाखालील ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांनंतर जालना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) बाळासाहेब खरात यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु नंतरतर १००% अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी, राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार १००% शिक्षकांची अनुदान देऊन वेठबिगारी संपवावी, ४०%, ६०%,८०% १००% टप्पा वाढीचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करावेत, आरटीई कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करा तसेच पदोन्नतीसाठी टीईटीची अट रद्द करा, शिक्षकांची ‘बीएलओ कामातून मुक्तता करावी त्याप्रमाणे मतदार याद्यांच्या पुर्नार्नरीक्षण (एसआयआर) साठी सहायक करण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुया रद्द कराव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या निदर्शनात शेषराव गोरे, एफ. एस. सय्यद, आर. बी. भुसारे, एस. बी. दुबे, बाळासाहेब सावंत, बी. ए. बागल, पी. जी. ढाकणे, ए. एच. शेजूळ, जे.एम. वैष्णव, एम. एच. चव्हाण, व्ही, बी. इफ्पर, आर.एन. गाढे यांच्यासह शिक्षक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

