जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महेबुब खान पठाण यांची जाफ्राबाद शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. संघटन सृजन अभियानाअंतर्गत प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी जिल्ह्यात दौरे करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि आगामी राजकीय आव्हानांचा आढावा घेतल्यानंतर शहराध्यक्षपदासाठी महेबुब खान पठाण यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. नवीन अध्यक्ष म्हणून महेबुब खान पठाण यांच्यासमोर शहरातील पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, बूथस्तरावरील संघटन बळकट करणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याची जबाबदारी असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सम र्थकांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जाफ्राबाद शहरातील काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आगामी काळात पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक गतिमान करण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.




