माणसांनी माणसांच्या भल्यासाठी झटावे : जाती धर्माच्या नावावर आपसात भांडू नका : आर्किटेक्ट अर्शद शेख

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17
टेंभुर्णी – मानव म्हणून आम्ही सर्व एकच आहोत. यासाठी मानवता धर्माचे पालन करत माणसाने माणसाच्या भल्यासाठी सदैव झटत राहावे असे आवाहन पीस फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक अर्शद शेख यांनी केले. शनिवारी टेंभुर्णी दौऱ्यावर आले असता ते येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात आयोजित एका कार्यक्रमात गावातील सर्वधर्मीय समाज बांधवांसोबत संवाद साधत होते. यावेळी मंचावर पीस फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक मिर्झा अफसर बेग, बुलढाणा जिल्हाध्यक्ष आलम कोटकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पी.जी. तांबेकर, माजी सुभेदार प्रभू वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रघुराम उखर्डे, संस्था अध्यक्ष हबीब ऐद्रुस चाऊस, मौलाना शमशुद्दीन, हाफिज हारून खान, वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना अर्शद शेख म्हणाले की आज जाती आणि धर्माच्या नावावर माणसामाणसात द्वेष निर्माण केला जात आहे. यासाठी आम्हाला आज द्वेषाचा नव्हे तर प्रेमाचा संदेश प्रत्येकाला द्यायचा आहे. आमच्या सुखदुःखात आम्हालाच धावून जावे लागते त्यावेळी आम्ही कोणीही आमच्या जाती आणि धर्माचा विचार करत नाही. ईश्वराने आम्हाला एकमेकांच्या सोबत चांगले वागण्यासाठी पाठविले आहे. आज देशासमोर शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी आधी अनेक ज्वलंत प्रश्न असताना केवळ जाती धर्माच्या भिंती उभ्या करून आम्हाला जाणीवपूर्वक त्यामध्ये गुंतवून ठेवले जात आहे. यासाठी आम्ही केवळ माणूस म्हणून एकमेकांसाठी उभे राहिले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी पीस फाउंडेशन तर्फे सध्या संपूर्ण देशभर राबविल्या जात असलेल्या आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचे घटक बनावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अर्शद शेख लिखित इस्लाम द अल्टिमेटम ऑफ आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक वाचनालयासह उपस्थितांना भेट देण्यात आले. यावेळी शिक्षक दिनकर ससाने यांनी आपल्या भाषणात समाजाच्या भल्यासाठी सर्व धर्मीय समाज बांधवांनी एकत्रित येणे काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिर्झा अफसर बेग यांनी केले तर सुत्रसंचलन शेख साबेर यांनी केले. कार्यक्रमाला नवभारत शिक्षण संस्था उपाध्यक्ष शेख जमीर, आदर्श शिक्षक सखाराम बोरकर, सुरेश बोर्डे, दिनकर ससाने, युसुफ सौदागर, शेख सादिक, बी. डी. सवडे, प्रदीप मुळे, राजेश चव्हाण, ज्ञानेश्वर उखर्डे, भिकाजी खांडेभराड, मुख्तारखा पठाण, सय्यद बाबा, नसीम शेख आदींची उपस्थिती होती.
फोटो – टेंभुर्णी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना 30 फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख




