जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन
जालना/प्रतिनिधी,दि.26
भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त करीत लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प केला.
याप्रसंगी प्रभारी तहसीलदार तुषार निकम, नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, सतीश तायडे, दीपाली राऊत, शिल्पा मगरे, कुंता पठाडे, स्वाती राठोड, संतोष पगार, रविंद्र हेलगट, बाबू कांबळे, सुनील काळुंके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक महसूल अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाचे संविधान स्वीकारले. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान निर्मितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अमूल्य योगदान या दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवले जाते. नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, संविधानाने दिलेले अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये यांची माहिती पोहोचविणे, तसेच लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जनजागृती करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असून, देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यात त्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
यावेळी उपस्थितांनी संविधानातील मूल्यांचे पालन करण्यासोबतच नागरिक म्हणून आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडण्याचा आणि देशाची एकात्मता व अखंडता कायम राखण्याचा संकल्प केला.


