pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिक्षक भरतीऐवजी ‘उसनवारी’चा मार्ग! सरकारचा निर्णय तातडीने रद्द करा – राजकुमार कदम.

डी.एड., बी.एड.धारक बेरोजगारांच्या भविष्याशी सरकारचा खेळ; पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीची मराठवाडा शिक्षक संघाची मागणी.

0 5 1 4 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 4

शिक्षक होण्यासाठी डी.एड., बी.एड. यांसारख्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण करणे, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे अशा अनेक अटी सरकारने घालून दिलेल्या आहेत. या सर्व पात्रता पूर्ण करून हजारो तरुण शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत असताना शिक्षकांची नियमित भरती करण्याऐवजी शिक्षकांची पदे उसनवारी तत्त्वावर भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ‘विषय सहाय्यक’ पदे उसनवारी तत्त्वावर भरण्याबाबत निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर ‘विषय सहाय्यक निवड प्रक्रिया’ हा लिंक उपलब्ध करून देण्यात आला आहे. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरकार एकीकडे शिक्षक होण्यासाठी उच्च शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे निकष लावते, शिक्षक पात्रता परीक्षा घेते, तर दुसरीकडे या सर्व पात्रता पूर्ण केलेले तरुण बेरोजगार असताना उसनवारीच्या माध्यमातून शिक्षकांची पदे भरण्याचा मार्ग अवलंबते, ही विसंगती संतापजनक आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
शिक्षकांच्या नियमित रिक्त जागा भरल्या जात नसल्याने शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना सरकारने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात उसनवारीची पद्धत रूढ करणे म्हणजे शिक्षणव्यवस्थेच्या स्थैर्याशी तडजोड करणे होय.
शिक्षणाची अशी हेळसांड करून देश महासत्ता कसा होणार? असा सवाल उपस्थित करत राजकुमार कदम यांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारने विषय सहाय्यक पदे उसनवारी तत्त्वावर भरण्याबाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करावे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या नियमित रिक्त जागांची पारदर्शकपणे भरती करावी आणि पात्रताधारक बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षकांची नियमित भरती, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पात्रताधारक तरुणांना रोजगार या तिन्ही बाबी सरकारने गांभीर्याने विचारात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असेही राजकुमार कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 4 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे