ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हिल व महिला रुग्णालयाच्या ओपीडी वेळेत बदल करा भास्कर आबा दानवे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

जालना/प्रतिनिधी,दि 27
जालना येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) तसेच शासकीय महिला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळेत बदल करून ती सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर हे जालना दौऱ्यावर आले असता यांच्याकडे (दि.२७) निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये येत असतात. मात्र, सध्या या दोन्ही रुग्णालयांच्या ओपीडीची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते ६ अशी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना लांबचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा रुग्णालयात पोहोचेपर्यंत दुपारचे १२ ते १२.३० वाजतात. त्यामुळे ओपीडीची वेळ संपत आल्याने अनेक रुग्णांना वेळेत तपासणी व उपचार मिळण्यात अडचणी येतात. तसेच दुपारी ओपीडी बंद झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांना रुग्णालयातच थांबावे लागते. विशेषतः महिला, वृद्ध, लहान मुले तसेच लांबच्या गावांमधून आलेल्या रुग्णांना या वेळापत्रकामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचा विचार करता ओपीडीच्या वेळेत बदल करणे आवश्यक असल्याचे भास्कर आबा दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी सलग ओपीडी सुरू ठेवल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सोयीच्या वेळेत उपचार घेता येतील. तसेच दुपारच्या वेळेत ओपीडी बंद राहण्यामुळे होणारी गैरसोयही दूर होईल. यामुळे रुग्णांना विनाकारण ताटकळत बसावे लागणार नाही.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्यसेवा अधिक सुलभ व सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध व्हावी, या दृष्टीने जालना येथील सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महिला रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती भास्कर आबा दानवे यांनी आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.



