बुटखेडा येथील जि.प. शाळा धोकादायक अवस्थेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांचा अमरण उपोषणाचा इशारा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
बुटखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेचे छत पूर्णपणे खराब झाले असून टिनपत्रे गंजून निकामी झाली आहेत. पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. काही भागातील भिंतींची पडझडही सुरू असल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शाळेची ही अवस्था पाहून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. परिणामी, शाळेतील विद्यार्थी संख्येतही घट होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असताना संबंधित विभागाकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शाळेची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली, पत्रव्यवहार केला तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन शाळेची पाहणी करण्याची विनंती केली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने शाळेची दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारतीस मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुटखेडा गावातील ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने जिल्हा परिषद, जालना येथे अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. यावेळी मुख्याध्यापिका सांगळे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य योगेश बनकर, दुर्योधन बदर, मच्छिंद्र पांडव, गायकवाड सर, शिकणे सर, राहुल बनकर, संदीप जाधव, नितेश जाधव, राजेंद्र बनकर, ऋषी बनकर, स्वप्नील बदर, रामेश्वर बनकर, बाबासाहेब बनकर, दामोदर बनकर, पंढरीनाथ बनकर, सुधाकर चंदनशिव, पांडुरंग बनकर, विठ्ठल बनकर अनिल पवार, मदन साबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____________________________________________
प्रतिक्रिया “जाफ्राबाद तालुक्यातील मौजे बुटखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले होते. शाळा आवारातील निलगिरीचे झाड वर्गखोल्यांवर कोसळल्यामुळे छत व इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर संबंधित बाबीची माहिती तहसीलदार तसेच गटशिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे देण्यात आली होती.त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार या दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, निधी मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही आमची प्राथमिकता असून प्रशासनानेही या कामाला गती द्यावी, अशी अपेक्षा आहे.” गजानन मांटे केंद्रप्रमुख डोनगाव __________________________________________
4 एप्रिल 2026 ला या कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आहे. परंतु आतापर्यंत हे कामाची मान्यता ग्रामपंचायत ला आली नाही, आम्ही मुख्यअधिकारी यांच्याकडे गेलो होतो, लवकर हे काम सुरु नाही तर आम्ही जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणार आहे योगेश बनकर ग्रामस्थ बूटखेडा


