ब्रेकिंग
आ. महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निघणार महाविकास आघाडीचा मोर्चा.
तहसीलदारांना निवेदन देऊन आ. महेश बालदी यांना अपात्र घोषित करण्याची शासनाकडे करणार मागणी. उरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती.
0
5
4
9
5
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
महिलांचा अपमान करणारा, त्यांना अपशब्द वापरणारा लोकप्रतिनिधी असूच शकत नाही. महिलांचे नेहमी अपमान करणाऱ्या आ. महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा सचिव यांच्याकडे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली.उरण शहरात कामठा रोड हॉटेल शामियाना येथे पत्रकार परिषद संपन्न झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला नेत्या तथा उरण नगर परिषदेचे नागराध्यक्ष भावनाताई घाणेकर, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )चे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर,कामगार नेते कॉ. भूषण पाटील,कामगार नेते रवि घरत, शेकापचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजस्विनी घरत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, शिवसेना युवा शहर प्रमुख आशिष गोवारी तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या सर्वच पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
२०१० पासून मयूर घरतने पाठपुरावा करून झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढा दिला. आज निकाल मयूरच्या बाजूने लागला आहे. महेश बालदी यांनी मयुरच्या आईला अश्लील शिवीगाळ केली होती. मयूरला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी व भविष्यात कोणत्याही आई बहिणीचा अपमान होऊ नये तसेच आमदार महेश बालदी यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले सर्व पदाधिकारी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. यापूर्वी महिलांवर अनेक अत्याचार झाले परंतु हा आमदार कुठेही दिसला नाही त्यामुळे सदर व्यक्तीला शिक्षा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे असे मत पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी व्यक्त केले.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की मी सुद्धा न्यायालयात आ. महेश बालदी यांच्या विरोधात एक वेगळी याचिका दाखल केली असून त्याचा निकाल लवकरच ६ महिन्यात लागण्याची शक्यता आहे. महिलांचा अपमान करणारा असा लोकप्रतिनिधी जनतेला नको आहे. त्यामुळे १ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
माजी आमदार बाळाराम पाटील यांनीही न्यायालयाचे निकाल वाचवून दाखवत आ. महेश बालदी यांनी महिलांचा कशा प्रकारे अपमान केला हे सांगितले. कोर्टाचा निकाल लागल्या नंतर महेश बालदी यांना कोर्टाने शिक्षा देऊनही काही त्यांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत त्यांनी महिलांचे रक्षण केले, महिलांचा पाठीराखा कसे आहेत याचे मेसेज, संदेश सर्वत्र फिरविले हे चुकीचे आहे. चुकीच्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे असे परखड व स्पष्ट मत बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य डॉ मनिष पाटील यांनीही माहिती देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१० मधील एका मारहाण प्रकरणात तब्बल १६ वर्षांनंतर हा निकाल लागला असून, बालदी यांच्यासह एकूण चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयाने चारही दोषींना तात्पुरता जामीन मंजूर केल्याने त्यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. या निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.तब्ब्ल १६ वर्षांनंतर हा निकाल लागला असून या प्रकरणाचा खटला अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता. सुनावणीअंती न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे आमदार महेश बालदी यांच्यासह चौघांना दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळाची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व अपात्र ठरण्याची तरतूद आहे. अलिबाग न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावल्याने आमदार महेश बालदी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत उरण शहरातील कामठा रोड वरील हॉटेल शामियाना येथे पत्रकार परिषद घेऊन आ. महेश बालदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आमदारकिचे पद रद्द व्हावे अशी मागणी केली आहे.महाराष्ट्र शासनाने त्यांना अपात्र म्हणून घोषित करावे या मागणीच्या अनुषंगाने दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान कोटनाका श्री राघोबा मंदिर उरण शहर येथून ते तहसील कार्यालय उरण येथे महाविकास आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
5
4
9
5
5



