टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या सावरगाव मस्के येथील अनामिका मस्के हिची पोलीस पदी निवड.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
टेंभुर्णी – जाफराबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के येथील अनामिका दिलीप मस्के हिची नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झाली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी असलेल्या अनामिका चा तिच्या आई-वडिलांसह गुरुवारी गावच्या शाळेत सत्कार करण्यात आला. यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने गौरवलेल्या वारकरी सकीर्तन सेवा प्रतिष्ठानच्या दिंडीचे विणेकरी तथा सावरगाव येथील रहिवासी दिनकरराव मोरे यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम म्हस्के, देशसेवा बजावत असलेले गावातील सैनिक शरद म्हस्के, रंगनाथ म्हस्के, दिनकर म्हस्के, सिंधूताई म्हस्के, दिलीप म्हस्के आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी अनामिका म्हस्के हिने आपल्या मनोगतात सांगितले की आपल्या या यशात आई-वडिलांच्या अथक परिश्रमाचे व गावातील जि. प. शाळेने दिलेल्या संस्काराचे विशेष योगदान आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून आपले लक्ष्य शालेय जीवनातच निश्चित केले पाहिजे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकता. तेव्हा खूप शिका आणि मोठे होवून आपल्या गावचे व आई वडिलांचे नाव मोठे करा असे आवाहनही तिने विद्यार्थ्यांना केले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सुनीता देशपांडे यांनी अनामिकाला श्यामची आई हे पुस्तक भेट देऊन तिचा गौरव केला. विशेष म्हणजे अनामिकाची आई सिंधुताई म्हस्के या याच शाळेत स्वयंपाकी म्हणून कर्तव्य बजावत आहे. अतिशय गरीब परिस्थितीत संसाराचा गाढा ओढत तिच्या आई-वडिलांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नसीम शेख यांनी केले तर प्रास्ताविक शिक्षिका सुनीता देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक भाऊसाहेब जाधव, गजानन डोमळे, कैलास जाधव, सुभद्रा घोडके, सुखदेव चेके आदींसह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
फोटो – मुंबई पोलीस पदी निवड झालेल्या अनामिका म्हस्के व विणेकरी दिनकरराव मोरे यांचा सत्कार करताना शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व शिक्षक वृंद. इन्सॅट मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना अनामिका म्हस्के.




