जाफराबाद-चिखली मार्गावरील जळालेल्या कार प्रकरणाचा २४ तासांत पर्दाफाश
विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव; तरुणाची हत्या दोन आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार, पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
जाफराबाद-चिखली मार्गावरील गोपी शिवारात जळालेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा जालना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करून विम्याची रक्कम मिळवणे आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी मुख्य आरोपीने नाशिक येथील एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये जाळल्याचे तपासात समोर आले आहे.
जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपी शिवार येथे ३१ मे रोजी पहाटे एका अल्टो कारला आग लागून त्यामध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रथमदर्शनी ही घटना अपघाती वाटत असल्याने जाफराबाद पोलीस
ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २१/२०२६ दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या सखोल व तांत्रिक तपासादरम्यान या घटनेमागील धक्कादायक सत्य उघडकीस आले. तपासात कथित मृत व्यक्ती म्हणून समोर आलेला नितीन प्रभाकर गवळी हा जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. तो मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला होता. विम्याची रक्कम मिळवून आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात नितीन गवळी याने त्याचे साथीदार अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने नाशिक येथील संदीप चौहाण या तरुणाचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर मृतदेह अल्टो कारमध्ये ठेवून वाहनास आग लावण्यात आली. जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच असल्याचा आभास निर्माण करून पोलीस व नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला असून
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ६२(२) (अ), २३८ (अ) (ब) व ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून या कटाचा मुख्य सूत्रधार नितीन गवळी याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. जळालेल्या मृतदेहाची शास्त्रोक्त ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.




