तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता पुन्हा अडविला; बाधित शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा!
१ डिसेंबरपर्यंत रस्ता खुला न केल्यास जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलनाचा इशारा; नांदखेड्यातील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
जाफ्राबाद तालुक्यातील मौजे नांदखेडा येथील गट क्रमांक १७०, १७२ व १७३/१ मधील पूर्वापार वहिवाटीचा शेतरस्ता तहसील प्रशासनाच्या आदेशानंतर खुला करण्यात आला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्याने पुन्हा हा रस्ता अडविल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. रस्ता नांगरून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १ डिसेंबरपर्यंत रस्ता खुला न झाल्यास जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात जनार्धन येडूबा म्हस्के, गजानन जनार्धन म्हस्के, गंभीर जनार्धन म्हस्के, पंढरी गजानन म्हस्के, विशाल गजानन म्हस्के, योगेश गंभीर म्हस्के, विष्णू गंभीर म्हस्के यांच्यासह महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार जाफ्राबाद, पोलीस व टेंभुर्णी पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, सदर शेतरस्ता खुला करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसील कार्यालयात वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर महसूल प्रशासनाने रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आणि प्रत्यक्षात रस्ताही खुला करण्यात आला. मात्र, काही काळातच संबंधित शेतकऱ्याने दमदाटी करून रस्ता पुन्हा नांगरून टाकला व त्या जागेवर वृक्षारोपण करून वाहतूक बंद केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, काही शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. रस्ता बंद झाल्यामुळे दैनंदिन ये-जा, शेतीची कामे आणि शेतीमालाची वाहतूक ठप्प झाली आहे. शेतातील माल बाहेर काढता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत असून, कुटुंबीयांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
प्रशासनाच्या आदेशालाच हरताळ?
एकदा प्रशासनाने आदेश देऊन रस्ता खुला केला असतानाही पुन्हा तो अडविला जात असेल, तर संबंधित आदेशाची अंमलबजावणी नेमकी कशी होते, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवावे, महसूल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत रस्ता कायमस्वरूपी खुला करावा आणि रस्ता अडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१ डिसेंबरची मुदत; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!
वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १ डिसेंबर २०२६ पर्यंत रस्ता खुला करून न्याय न मिळाल्यास जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या गंभीर निवेदनानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नांदखेडा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


