उद्याचे बोरशे गुरुजीचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
इस्टिमेट प्रमाणे रस्त्याची कामे पूर्ण करणार - PWD चे लेखी आश्वासन!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.30
भोकरदन तालुक्यातील करजगाव ते कल्याणी कुकडी फाटा व जळगाव सपकाळ ते सुरंगळी या दोन रस्त्यांची कामे निकृष्ट व अर्धवट असल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कडुबा विनायकराव बोरशे उर्फ बोरशे गुरुजी यांनी दि. 01/07/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय करजगाव येथे आमरण उपोषणाची पूर्वसूचना दिली होती.या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भोकरदन यांनी जा.क्र. 426 दि. 29/06/2026 रोजीचे लेखी पत्र देऊन, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील, साईड शोल्डरची कामे शासकीय मानकाप्रमाणे पूर्ण करून घेण्यात येतील व रस्त्यावर माहिती फलक लावण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनावरील विश्वास व जनतेच्या हिताचा विचार करून, बोरशे गुरुजी यांनी दि. 01/07/2026 रोजीचे नियोजित आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. यावेळी बोलताना बोरशे गुरुजी म्हणाले की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामाची प्रत्यक्ष प्रगती व दर्जा यावर आमचे कडक लक्ष राहील. मुदतीत कामे पूर्ण व दर्जेदार न झाल्यास, आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.जनतेच्या एकजुटीचा व कायद्याच्या मार्गाचा हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.


