मेहगावच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या सर्व दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे– बोरसे गुरुजी
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
भोकरदन तालुक्यातील मेहगाव हे गाव आज केवळ एक गाव राहिलेले नाही, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या लढाईचे प्रतीक बनले आहे. मेहगाव शिवारातील तब्बल २ हजार ५०० ते ३ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी डोळा ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा वाद नाही, तर शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या घामावर, त्यांच्या उदरनिर्वाहावर आणि त्यांच्या अस्तित्वावर घातलेला घाला आहे.
वर्षानुवर्षे, किंबहुना ४० वर्षांपासून शेतकरी या जमिनीत आहेत. त्यांनी ही जमीन कसली, पिकवली, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीवर केला. मेहगाव, धावडा, वडाळी परिसरातील अनेक शेतकरी प्रत्यक्ष जमीन कसत आहेत. तरीही आज त्यांनाच या जमिनीवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत आहे. हे किती दुर्दैवी आणि संतापजनक आहे!
बनावट कागदपत्रांचा खेळ – हा तर संघटित गुन्हा आहे
या प्रकरणात समोर आलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. मेहगाव जमीन संघर्ष समितीने सांगितल्याप्रमाणे, संबंधित जमिनीवर डोळा असलेल्या भूमाफियांनी नियोजनबद्ध पद्धतीने कट रचला. भरत चेलाराम मीरचंदानी यांच्या नावाने बांगलादेशी नागरिकाला उभे केले, त्याच्या नावावर बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले, आणि त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहाराचा दस्त नोंदवून घेतला, असा आरोप आहे.
एका व्यक्तीच्या पलायनानंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला मीरचंदानी असल्याचे भासवून नवीन आधार-पॅन तयार करण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण जमिनीचे अधिकारपत्र नोंदवून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विचार करा बंधूनो, आधारकार्ड – पॅनकार्ड ही देशाची ओळख आहे. तीच जर बनावट तयार होत असेल, तर ही सामान्य फसवणूक नाही. हा देशाच्या व्यवस्थेविरुद्धचा गुन्हा आहे. यामागे कोण आहे? हे कागदपत्र कोणी तयार केले? कोणी त्याला मदत केली? हे सर्व शोधून काढलेच पाहिजे.
शेतकऱ्यांवर दबाव – पोलिसांचा वापर?
या प्रकरणातील सगळ्यात वेदनादायक बाब म्हणजे ०७ सप्टेंबर २०२६ रोजी पारध पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह शेतात येऊन शेतकऱ्यांवर जमीन खाली करण्यासाठी दबाव आणला, गुन्हे दाखल करून अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पोलिस हे शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आहेत की भूमाफियांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी आहेत? हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. जर हा आरोप खरा असेल, तर ज्या अधिकाऱ्यांनी दबाव आणला, त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. कायदा हा गरीब शेतकऱ्याला घाबरवण्यासाठी नसतो, तर गुन्हेगाराला घाबरवण्यासाठी असतो.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशीला वेग – पण आता कारवाई हवी!
या प्रकरणात शासनाने विशेष चौकशी समिती गठीत केली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशीला वेग आला आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण आता फक्त चौकशी नको, तर कारवाई हवी!
चौकशी समितीने केवळ कागदपत्रे तपासून थांबू नये. जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे. कोण किती वर्षांपासून कसत आहे, याची सत्यता तपासावी.
आमच्या स्पष्ट मागण्या –
१. सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा – बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करणारे, ते वापरणारे, जमीन व्यवहाराचा बनावट दस्त नोंदवणारे, त्याला मदत करणारे अधिकारी, दलाल, भूमाफिया – कुणालाही सोडू नका. सर्वांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे, संघटित गुन्हेगारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल करून अटक करा.
२. दस्त व अधिकारपत्र रद्द करा – बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदवलेले सर्व व्यवहार, दस्त आणि अधिकारपत्र तात्काळ रद्द करा. जमीन पुन्हा मूळ वहिवाटदार शेतकऱ्यांच्या नावावर करा.
३. शेतकऱ्यांना संरक्षण द्या – ज्या ७० ते ८० शेतकऱ्यांवर दबाव आणला गेला, त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या. त्यांना पोलीस संरक्षण द्या. पुन्हा कोणी शेतात येऊन धमकी देणार नाही, याची हमी द्या.
४. अधिकाऱ्यांची चौकशी करा – हे बनावट दस्त नोंदवताना महसूल व नोंदणी विभागातील कोणते अधिकारी होते? त्यांनी कागदपत्रांची पडताळणी का केली नाही? त्यांचीही सखोल चौकशी करा. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा.
५. एसआयटी नेमून वेळेत चौकशी पूर्ण करा – या प्रकरणाची चौकशी लांबवू नका. विशेष तपास पथक (SIT) नेमून ठराविक वेळेत अहवाल घ्या आणि तो जाहीर करा.
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याच्या जमिनीवर डोळा ठेवणे म्हणजे देशाच्या अन्नावर डोळा ठेवण्यासारखे आहे. आज मेहगावमध्ये घडते आहे, उद्या ते तुमच्या गावात घडू शकते. म्हणून ही लढाई फक्त मेहगावच्या शेतकऱ्यांची नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची आहे.
शासनाला आमची हात जोडून विनंती आहे – या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई करा. शेतकऱ्याला न्याय द्या. नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
शेतकरी जगला तर देश जगेल!
मेहगावच्या शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे!




