विनाअट सरसकट कर्जमाफी करा —-रामधन कळल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14
शेतकऱ्यांसाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असून, या योजनेतील जाचक अटी, शर्ती बघता ही योजना म्हणजे कर्जमाफी नसून कर्जवसुली आहे की काय ? असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. तर यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. संबंधित शासन निर्णय बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष जाफराबाद तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कर्जमाफी योजनेत २०१९ ते २०२६ दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या महात्मा जोतिराव फले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. त्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. २०१९ साली राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभघेतला होता. याचाच अर्थ यंदाच्या कर्जमाफीतून या ३३ लाख शेतकऱ्यांना संपूर्ण लाभ मिळणार नाही. या योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांहून अधिक आहे. त्यांनी एकवेळ समझोताअंतर्गत २ लाखांवरील रक्कम भरली तरच त्यांना २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. आणि सध्या त्यांचे कर्ज ५० हजारांहून अधिक आहे. त्यांनी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेतील अटीनुसार ज्या शेतकऱ्यांनी २०२२- २३ व २४-२५ यापैकी कोणत्याही दोन वर्षांतील पीक कर्जाची वेळेत परतफेड केली असेल त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. परंतु, हा प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे २०२५-२६ आणि सन २०२६-२७ चे पीक कर्ज भरलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे यासारख्या जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करावी जेणे करून पडलेले शेतीमालाचे भाव व वाढलेली महागाई या संकटातून शेतकरी उभा राहू शकेल. नसता शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, गणेश बापू चव्हाण, एकनाथ शेवत्रे, संतोष अंभोरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



