मंठा नगर पंचायत मध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.30
स्वच्छता ही सेवा २०२६ व सेवा संकल्प अभियानांतर्गत मंठा नगर पंचायत यांच्या वतीने शहरातील सफाई मित्रांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सफाई मित्रांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्याशी संबंधित काही तक्रारी आढळून आल्यास संबंधितांना डॉक्टरांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दैनंदिन कामकाजात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता काम करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
सफाई मित्र हे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखण्याचे काम ते नियमितपणे करीत असतात. कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यासारखी विविध कामे करताना त्यांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामुळे सफाई मित्रांना आरोग्यविषयक तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. सफाई मित्रांनीही आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




