जलसंवर्धन ही काळाची गरज; युवकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल

जालना/प्रतिनिधी,दि.5
माय भारत, जालना, यशदा, युनिसेफ आणि पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जलदिंडी अभियानाचा’ समारोप जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाडळी (ता. बदनापूर) येथे उत्साहात संपन्न झाला. दि. 1 ते 5 जून, 2026 या कालावधीत बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानाद्वारे जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलदान करून आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशीमा मित्तल उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी पाथ्रीकर कॅम्पसचे संचालक डॉ. देवेशजी पाथ्रीकर होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजू, जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे, तहसीलदार अतुल बने, डॉ. रामदास निहाळ, अमृत तारो आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा तुळशीच्या रोपांचे वितरण करून सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलव्यवस्थापन आणि वृक्षसंवर्धन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाढते जलसंकट, भूजल पातळीतील सातत्याने होत असलेली घट आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता युवकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत जलसंवर्धन आणि जलसाक्षरता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. युवकांनी निसर्गाशी एकरूप होत पाणी बचत, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनाबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जलसंपत्ती निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजू यांनी युवकांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जलव्यवस्थापनाच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शिवकालीन किल्ले, तलाव, बंधारे आणि जलसाठवण व्यवस्था आजही जलसंवर्धनाचे आदर्श उदाहरण आहेत. आधुनिक काळातही त्या पद्धतींचा अभ्यास करून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. यावेळी जलदिंडी अभियानात सहभागी स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना पाणी बचत, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विविध गावांमध्ये रॅली, जनजागृती फेऱ्या, संवाद सत्रे आणि प्रत्यक्ष प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी सांगितले की, जलदिंडी अभियान दि. 1 ते 5 जून दरम्यान सोमठाणा, निकळक, अकोला, देवगाव, कुसळी, मात्रेवाडी, सेलगाव आणि पाडळी या गावांमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले. या अभियानाद्वारे युवक, महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये जलसाक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेशजी पाथ्रीकर यांनी जलसंवर्धनाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्षलागवड केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता त्याचे जतन, संगोपन आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेवक पवन अवघन, पोलीस पाटील भाग्यश्री शेळके, अविनाश शेळके, युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, प्रा. अविनाश हटकर तसेच विविध स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. -*-*-*-*-*- वृत्त क्र. : दि. 5 जुन, 2026 विशेष संक्षिप्त पुनरीक्षण : मतदारांना पासपोर्ट साईज छायाचित्र तयार ठेवण्याचे आवाहन जालना,दि.5(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) अभियान सुरू असून, ज्या मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही, अस्पष्ट आहे, जुने झाले आहे किंवा अद्ययावत करणे आवश्यक आहे, अशा सर्व मतदारांनी आपले अलीकडील पासपोर्ट साईज छायाचित्र तयार ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. मतदार यादीतील माहिती अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत छायाचित्रांची आवश्यकता भासणार आहे. मतदारांकडून घेण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर केवळ अधिकृत निवडणूक कामकाजासाठीच करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांच्या ओळखीची अचूकता वाढण्यास मदत होईल तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठीही हे उपयुक्त ठरणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि परिणामकारक होण्यास मदत मिळेल. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी क्षेत्रीय पडताळणीसाठी भेट देणार आहेत. यावेळी नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, मागणी केल्यास अद्ययावत पासपोर्ट साईज छायाचित्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व मतदारांच्या सक्रिय आणि वेळेवर मिळणाऱ्या सहकार्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम नियोजित कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण होण्यास मदत होईल.
