pub-7425537887339079
ब्रेकिंग

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

रक्तसाठ्याच्या अद्ययावत माहितीचा मुद्दा विधिमंडळात; आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सर्व रक्तपेढ्यांनी त्यांच्या रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही काही रक्तपेढ्यांकडून ही माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करत या महत्वाच्या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. या प्रश्नात मालेगाव शहरातील मालेगाव रक्तपेढी, सेवा रक्तपेढी, अन्सार रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढी आणि सर जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, सायन, नायर व राजावाडी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा अपुरा पडत असल्याने थॅलेसेमिया रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे अनेक रुग्णांना स्वखर्चाने खासगी रक्तपेढ्यांकडे जावे लागत असल्याची बाबही त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणली. या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, राज्यातील काही रक्तकेंद्रांकडून रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचे अंशतः खरे आहे. मात्र, या कारणामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक रक्त मिळण्यात अडचणी आल्याची कोणतीही तक्रार राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्राप्त झालेली नाही. मालेगाव (जि. नाशिक) येथील मालेगाव रक्तपेढी, सेवा रक्तपेढी, अन्सार रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढी, सर जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, सायन, नायर आणि राजावाडी रुग्णालयांमधील रक्तसाठ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत मुंबई व नाशिक जिल्ह्यातील संबंधित रक्तकेंद्रांमध्ये एकूण २५,३३४ युनिट रक्तसाठा उपलब्ध होता. त्यापैकी २४,४४६ युनिट रक्ताचा वापर करण्यात आला असून आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्यात आला आहे. थॅलेसेमिया रुग्णांना रक्त उपलब्धतेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाच्या १२ फेब्रुवारी २०१४ च्या निर्देशांनुसार तसेच राज्य शासनाच्या १८ जून २०१४ च्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व अशासकीय रक्तकेंद्रांनी थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. राज्यातील रक्तसाठ्याची रिअल-टाईम माहिती उपलब्ध राहावी यासाठी केंद्र शासनाच्या ई-रक्तकोष तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची माहिती नियमित अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असून सर्व रक्तकेंद्रांकडून वेळेवर माहिती भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. याशिवाय, रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर शासन निर्णय दिनांक २ डिसेंबर २०२० नुसार प्रति दिन एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार सन २०२५-२६ मध्ये एकूण ३२ लाख ६७ हजार रुपयांचा दंड संबंधित रक्तकेंद्रांवर आकारण्यात आल्याची माहितीही त्यांनी लेखी उत्तरात दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे