कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य आणि कला आणि महाविद्यालय येथे आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (DLLE) व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. एच. के. जगताप यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. ए. आर. कांबळे यांनी करून दिला.
यावेळी डॉ. पी. आर. करुळकर, डॉ. एम. जी. लोणे आणि डॉ. डी. पी. हिंगमिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनातून ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची जोपासना करावी, असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. गर्जे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले की, “आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माहिती सहज उपलब्ध होत असली तरी विवेक, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांचे संस्कार गुरुच देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आदर, कृतज्ञता आणि निष्ठा कायम ठेवत ज्ञानासोबतच नैतिक मूल्यांचेही संवर्धन करावे”. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन T.Y.B.com विद्यार्थी आरती पाटील हिने केले. तसेच खुशी शर्मा, देवयानी, अमिना खान, प्राप्ती, शुभम आणि फातिमा या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरुंचे जीवनातील स्थान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत सादर केले.
कार्यक्रमाचा समारोप सहयोगी प्राध्यापक व्ही. एस. इंदुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.