लोककलेच्या संवर्धनासाठी बालकलाकारांनी पुढाकार घ्यावा
बालरंगभूमी शाखा तर्फे कै. बाबुराव जाफ्राबादकर विद्यालयात बालशिबिराचे आयोजन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
बालरंगभूमी शाखा, जालना यांच्या वतीने कै. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयात बालशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना लोककलेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा तसेच लोप पावत चाललेल्या लोककला व संस्कृतीच्या संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सिनेअभिनेत्री वैशाली दाभाडे, शिबिर मार्गदर्शक रवीकुमार धुताडमल ( अभिनेता गायक व वादक) मार्गदर्शक डॉ. सय्यद अमजद( दिग्दर्शक तथा कार्याध्यक्ष बालरंगभूमी शाखा जालना)तसेच संबळवादक आर्यन काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लोककलेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. गोंधळ, लावणी, लोकगीते आदी लोककलाप्रकारांची परंपरा आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
सिनेअभिनेत्री वैशाली दाभाडे यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मीनाक्षी कुलकर्णी यांनी केले. डॉ. सय्यद अमजद सर यांचे स्वागत सोजे सर यांनी, तर रवीकुमार सर यांचे स्वागत श्री. संदीप इंगोले यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वैशाली दाभाडे म्हणाल्या की, दि. २७ सप्टेंबर रोजी बालरंगभूमी शाखा, जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे. लोप पावत चाललेल्या संस्कृती, परंपरा आणि लोककलांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बालकलाकारांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. हे व्यासपीठ केवळ बालकलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत लोककलेच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोककलेची ओळख, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि जतन करण्याची जबाबदारी यांची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप इंगोले यांनी केले. शिबिरास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व बालकलाप्रेमी उपस्थित होते.




