एचपीव्ही लसीकरणासह आरोग्यविषयक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना/प्रतिनिधी,दि.6
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये एचपीव्ही लसीकरण, कर्करोग प्रतिबंधाबाबत जनजागृती तसेच छातीच्या क्ष-किरण तपासणी शिबिरांचा समावेश होता.
प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी बु. अंतर्गत राजूर येथील मोरेश्वर शाळेतील 6 मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. एचपीव्ही लसीकरणामुळे महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध होण्यास मदत होते. या उपक्रमातून मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अन्वा येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींना एचपीव्ही विषाणू, त्यापासून होणारे आजार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘प्रतिबंध हाच उपचारापेक्षा उत्तम मार्ग’ हा संदेश देण्यात आला. या उपक्रमादरम्यान 13 मुलींना एचपीव्ही लसीकरणाचा लाभ मिळाला.
तसेच ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ तिशीचा पल्ला आरोग्याचा सला या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र केदारखेडा येथे छातीच्या क्ष-किरण तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 78 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 40 पुरुष आणि 38 महिला यांचा समावेश होता.
‘सेवा संकल्प अभियान’ च्या माध्यमातून आरोग्य तपासणीसोबतच कर्करोग प्रतिबंध, एचपीव्ही लसीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृतीवर भर देण्यात येत असून, नागरिकांना वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना यांनी केले आहे.



