श्रामनेरांना धम्माची अमूल्य शिकवण !

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
जालना येथील समर्थ नगर परिसरातील तक्षशिला बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित दहा दिवसीय श्रामनेर संस्कार शिबिरात श्रामनेरांना धम्माची मोलाची शिकवण देण्यात आली. या शिबिरात भदंत थेरो शिवली यांनी श्रामनेरांना त्रिशरण व पंचशील यांचे सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी नैतिक आचरणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “मी चोरी करणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी व्यभिचारापासून दूर राहीन, मी खोटे बोलणार नाही,” या पंचशील तत्वांचे पालन केल्याने मानवी जीवन अधिक शुद्ध आणि संतुलित बनते. तसेच मद्य, अमली पदार्थ आणि इतर मादक वस्तूंपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. पंचशील ही बौद्ध धर्मातील नैतिकतेची मूलभूत तत्त्वे असून, त्यांचे आचरण केल्यास समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवी मूल्यांची जपणूक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथागत बुद्धांनी दिलेल्या या शिकवणीचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमास अशोक गंगावणे, अजय ढवळे, संदीप इंगोले, सुप्रिया बगळे, ज्योती मगरे, मिनाबाई शरणागत, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेश सदावर्ते व गुरूजी रवींद्र दारोकर यांची उपस्थिती होती.




