आठव्या राष्ट्रीय बँडी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील तीन युवा खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. वरदा केदार असारकर, सात्विक बाजी आणि शिवांश तांडेल या तिन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवून उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत वरदा असारकर हिने १२ वर्षांखालील मुलींच्या (U-12 Girls) गटातून सहभाग घेत सुवर्णपदक पटकावले. तर सात्विक बाजी आणि शिवांश तांडेल यांनी १२ वर्षांखालील मुलांच्या (U-12 Boys) गटातून खेळताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
या खेळाडूंच्या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि नियमित सराव यांचा मोठा वाटा आहे. त्यांना प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडत सुवर्णपदकांची कमाई केली.
तीनही खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे प्रशिक्षक, पालक, कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे उरणमधील इतर युवा खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.
उरणच्या तीन युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावून उरण आणि रायगड जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.