छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जाफ्राबाद येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.19
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जाफ्राबाद येथे सोमवार, दि. १८ मे रोजी तालुक्यातील शिवशंभू प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्याने थैलेसीमियाग्रस्त मुलांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भर उन्हाळ्यातही तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून युवक, व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी म ोठ्या उत्साहात शिबिरात सहभाग घेतला. थैलेसीमियाग्रस्त मुलांना नियमित रक्ताची आवश्यकता भासत असल्याने या शिबिरामुळे अनेक गरजू मुलांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक दीपक पाटील वाकडे, पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे आणि साहेबराव कानडजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म ान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत प्रत्येक तरुणाने नियमित रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या तरुण पिढीमध्ये सामाजिक कार्याबद्दल वाढत असलेली जाणीव समाजासाठी सकारात्मक बाब आहे. रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाजामध्ये माणुसकीची भावना अधिक दृढ होत असून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत आहे. शिबिरादरम्यान विविध मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले व रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील गव्हाड, राजेश चव्हाण, सुरेश गवळी, कुंडलिक म ठे, एकनाथ शेवत्रे, मुकेश भारद्वाज, सचिन गौतम, प्रभू गाढे, डॉ. मयूर लहाने, अनिल वरगणे, बाबुराव लहाने, सुरेश दुनगहू, अजय बनकर, ज्ञानेश्वर शिंदे, संजय लोळगे, डॉ. विजय वायाळ, डॉ. स्वप्निल उबरहंडे, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. गजानन जोशी, डॉ. हरिदास फुके, डॉ. संजय सावळे, अमोल पडघन, विठ्ठल नखोत, संजय छडीदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे शहरात गेल्या ३० वर्षांपासून घाटगे मेडिकलच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारे एकनाथ घाटगे पाटील यांनी तब्बल ५० वेळा रक्तदान करून रक्तदानाचे अर्धशतक पूर्ण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय तपासणी तसेच रक्तसंकलन प्रक्रिया सुरळीत पार पडली. या उपक्रमासाठी श्री सत्य साई ब्लड सेंटर, छत्रपती संभाजीनगर यांच्या वैद्यकीय पथकाने विशेष सहकार्य केले. अरुण वाकडीकर, चरनसिंग चव्हाण, रुपाली इंगळे, अरमाय वानरसे, सीमा गणराज, दिनेश चव्हाण आणि संतोष मगरे यांनी रक्त संकलनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. समाजामध्ये मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम जाफ्राबाद शहरासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



