हुमणी अळी नियंत्रणासाठी टेंभुर्णी येथे जनजागृती व प्रात्यक्षिक मोहीम.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे हुमणी अळीपासून संरक्षण करण्यासाठी टेंभुर्णी येथे कृषि विभागाच्या वतीने हुमणी अळी नियंत्रण व व्यवस्थापन मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत शेतकऱ्यांना हुमणी अळीची ओळख,प्रादुर्भावाची लक्षणे तसेच प्रभावी नियंत्रण उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपकृषी अधिकारी श्री.संतोष गिरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या जीवनचक्राची माहिती देत, कीड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शेतकऱ्यांनी नियमित शेत निरीक्षण करून प्रादुर्भाव दिसून आल्यास तात्काळ शिफारशीत उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले.
ही मोहीम श्री.रवि खरात व श्री.विष्णू जोशी यांच्या शेतावर घेण्यात आली.कार्यक्रमादरम्यान हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत हुमणी अळी नियंत्रणासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.”हुमणी अळीमुक्त शेत समृद्ध शेतकरी”हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



