जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची परतूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहास भेट

जालना/प्रतिनिधी,दि.22
परतूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज भेट देऊन तेथील सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्यासह वसतिगृहाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी वसतिगृहातील निवास कक्ष, पलंग व गाद्या, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजनव्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच परिसराची बारकाईने पाहणी केली. इमारतीची स्वच्छता, खोल्यांमधील व्यवस्था आणि विद्यार्थिनींना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ही व्यवस्था यापुढेही सातत्याने उत्तम दर्जाची राहावी, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष विचारपूस केली. वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशद्वारावरील देखरेख व रात्रीची सुरक्षा व्यवस्था याबाबत त्यांनी माहिती घेतली. कोणतीही अडचण अथवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास निःसंकोचपणे गृहपाल किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी मुलींना केले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांनीही विद्यार्थीनींशी संवाद साधत पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास दिला व परिसरात आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.
संवादादरम्यान विद्यार्थीनींनी अभ्यासिका तसेच संगणकीय शिक्षणसाठी डेस्कटॉप संगणक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागण्यांची जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी तात्काळ दखल घेत आवश्यक पुस्तके व डेस्कटॉप संगणक लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड व संबंधित विभागाला दिले.




