जाफ्राबादसाठी स्वतंत्र गटविकास अधिकारी नेमावा-अजय बनकर वारंवार गैरहजेरीबाबत शिस्तभंग कारवाई व्हावी,प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी*

जाफ्राबाद/दत्ता देशमुख,दि.2
जाफ्राबाद तालुक्यातील पंचायत समितीचे कामकाज सुरळीत व गतिमान करण्यासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जालना यांच्या कडे निवेदनाद्वारे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय पाटील बनकर यांनी केली आहे. सध्या जाफ्राबाद व भोकरदन या दोन्ही तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार श्रीकृष्ण वेणीकर या एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने अनेक शासकीय कामांमध्ये विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. विविध दाखले,मंजुरी तसेच शासकीय योजनांसाठी नागरिकांना वारंवार पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अधिकारी नियमितपणे उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे बनकर यांनी सांगितले. वेळेत कामे न झाल्याने जनतेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून,कामाबाबत विचारणा केल्यास “तक्रार वरिष्ठांकडे करा” असे बेजबाबदार उत्तर दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी अजय पाटील बनकर म्हणाले, “हा प्रश्न माझा नसून जनतेच्या हक्काचा आहे. अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असतात,उपकार करण्यासाठी नाहीत.” तेव्हा तालुक्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी जाफ्राबाद पंचायत समितीसाठी स्वतंत्र गटविकास अधिकारी तात्काळ नियुक्त करावा,अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सदर अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळण्यात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. दाखले,मंजुरी तसेच विविध योजनांशी संबंधित कामांसाठी नागरिकांना पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचा वेळ,पैसा व श्रम वाया जात असून जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित गटविकास अधिकारी यांच्या कामकाजाची तात्काळ चौकशी करण्यात यावी. त्यांच्या वारंवार गैरहजेरीबाबत योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्यात यावी. जाफराबाद पंचायत समितीतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.




