विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतील त्रुटी पूर्तता करण्याची सोमवारपर्यंत संधी
जालना/प्रतिनिधी,दि.25
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाइन अर्जांमध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे व अर्जातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने शासनामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेतील संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीही कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे.
सन 2022-23 व 2023-24 या कालावधीतील ऑनलाइन अर्जांमध्ये त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे सादर करावीत. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज नस्तीबद्ध करण्यात येतील. त्यानंतर त्रुटी पूर्ततेची कोणतीही संधी दिली जाणार नाही. तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील, अशी माहिती त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.




