अखिल मानव जात एकाच माता-पित्याची लेकरे : सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे : शेख नसीर यांचे प्रतिपादन : जाफराबाद येथे ईद मिलन कार्यक्रम

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.4
अखिल मानव जात ही एकाच माता पित्याची संतान असून त्या अर्थाने आम्ही सर्व जण एकमेकांचे बांधव आहोत. म्हणून तर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे रक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला चालते. यासाठी आपसी भेदभाव विसरून प्रत्येकाने गुण्यागोविंदाने नांदावे.संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. पवित्र धर्मग्रंथ कुराण आणि प्रेषित मोहम्मद यांची जीवनी यात संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे मार्ग दडलेले आहे. रमजान महिन्याचे उपवास आला गरीबाची भूक व तहानेची जाणीव करून देतात. ईद चा सण व ईद मिलन सारख्या कार्यक्रमातून आमच्या राष्ट्रीय एकतेला आणखी बळकटी मिळते. आमच्या देशात द्वेषाचा नव्हे तर प्रेमाचा संदेश देऊन बंधुभाव कायम ठेवण्यासाठी सर्वधर्मीय समाज बांधवांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे विचार छत्रपती संभाजी नगर येथील जमात ए इस्लामी हिंदच्या सद्भावना मंचचे विभागीय प्रमुख शेख नसीर यांनी व्यक्त केले. जमात ए इस्लामी हिंद तर्फे शुक्रवारी जाफराबाद येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी आदींच्या मानवतावादी विचारांचाही उल्लेख करीत सर्वांनी संत महंताच्या सद्भावना तत्वाचा अंगीकार करावा असेही म्हटले. यावेळी मंचावर जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, एडवोकेट वि.भा. काष्टे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सब इन्स्पेक्टर रमेश विठोरे, टीव्ही सिरीयल निदेशक डॉ. पी.जी. देशमुख, फुले शाहू आंबेडकर विचाराचे विचारवंत दिनकर ससाने, शिक्षक पतसंस्थेचे सचिव वसंत शेवाळे, जाफराबादचे नकाराध्यक्ष दीपक वाकडे, काँग्रेस नेते सुरेश गवळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हबीब ऐद्रुस चाऊस, केंद्रप्रमुख एस. आर. फोलाने, सामाजिक कार्यकर्ते कदीरबाबा शेख आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी सतीश जाधव, ऍडव्होकेट काष्टे, दिनकर ससाने, डॉ. पी.जी. देशमुख, रमेश विटोरे, वसंत शेवाळे आदींनी सद्भावना या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचा प्रारंभ जमातचे जाफराबाद अध्यक्ष मुमताज पठाण यांच्या कुराण पठणाने करण्यात आला. सूत्रसंचालन मुमताज पठाण यांनी केले तर आभार नसीम शेख यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्वांसाठी शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जमात चे ताहेर काझी, इकबाल खान, नगरसेवक तालिब खान, युनूस खान, इद्रीस खान, अब्दुल मजीद, आदींसह युथविंग, एसआयओ व जमात ए इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. फोटो – जाफराबाद येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात सद्भावना या विषयावर मार्गदर्शन करताना सद्भावना मंचचे शेख नासेर.




