तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात; तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1
१ मे, महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ६६ वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच मंगलमयी दिनाचे औचित्य साधून उरण तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत अभिमानाने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धवजी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने परिसर दुमदुमला. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानिफ मुलाणी आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष सहकारी उपस्थित होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी उरण भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश बालदी तसेच उरण भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा, उरण नगरपरिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती जसीम गॅस, इतर सभापती, उपसभापती तसेच पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच उरण युवा अध्यक्ष निलेश पाटील, नवीन राजपाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि उरणमधील सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९६० मध्ये ‘मुंबई पुनर्रचना कायदा, १९६०’ संमत होऊन १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हून अधिक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी राज्यभर ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर शासकीय कार्यालयांत ध्वजारोहण, पोलीस संचलन आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये लावणीसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय सोहळा पार पडतो. राज्य सरकारने १ मे रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. उरण येथील कार्यक्रमात तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन केले व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सर्वधर्मसमभाव, एकात्मता आणि विकास’ या मूल्यांवर चालत महाराष्ट्राला देशात अग्रेसर ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.




