मोतीरामजी अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी व खातेदारांचे पैसे त्वरित परत करा! अन्यथा शेतकरी संघटनेमार्फत रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यात येईल! – काकासाहेब पाटील साबळे शेतकरी संघटना

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.23
मोतीरामजी अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भोकरदन शाखेत अनेक खातेदारांचे पैसे आणि ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत दिनांक 10 एप्रिल 2026 पासून बँकेने व्यवहार बंद केलेले आहेत. संबंधित बँकेचे मॅनेजर आणि कर्मचारी 15 एप्रिल 2026 पासून फरार झालेले आहेत. बँकेच्या शाखेला मात्र कुलूप लावून बंद केलेली आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला असून ठेवी ठेवणारे आणि खातेदार यांचे पैसे अडकून पडल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे शेतकरी संघटनेमार्फत दिनांक 20 मे 2026 रोजी निवेदन देऊन संबंधित बँकेची चौकशी करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच खातेदारांचे पैसे व ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करण्याबाबत सूचना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास शेतकरी संघटनेमार्फत रास्ता रोको करण्यात येईल तसेच जेलभोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे काकासाहेब पाटील साबळे यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे सुद्धा निवेदनात म्हटले असून निवेदनाच्या प्रति उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन तसेच भोकरदन पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेले आहेत.



