pub-7425537887339079
ब्रेकिंग

 जालन्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा; सरकारला जनतेच्या रोषाचा इशारा

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.21

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात जालन्यात मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोर्चाचे नेतृत्व करताना आनंदराज आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत लोकभावनेचा आदर करण्याचा इशारा दिला. यावेळी मोर्चात आनंदराज आंबेकडर, अ‍ॅड. अमन आंबेडकर, अ‍ॅड. सुरेश माने, संजय खामकर, परसराम इंगोले, महापौर वंदना मगरे, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण, सुधाकर निकाळजे, विलास डोळसे,डॉ.सुशिल सुर्यवंशी, महेंद्र रत्नपारखे, संदीप खरात, हरीष रत्नपारखे, अ‍ॅड. रिमा खरात, निखील पगारे, राहुल रत्नपारखे, जितू उघडे, मुरली बोबडे,भास्कर शिंदे,विनोद रत्नपारखे, सुनिल रत्नपारखे, अमोल रत्नपारखे, सुनिल साळवे, महेंद्र बनकर, राजेश सदावर्ते, अरुण वाघमारे, कुणाल दहीवाळ, कपील खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सरकार आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नावाखाली समाजात संभ्रम निर्माण केला जात असून लोकांच्या भावना दुर्लक्षित केल्या जात आहेत. सरकारने लोकशाहीचा आणि जनतेच्या मताचा आदर करावा. अन्यथा जनता सत्ताधार्‍यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून समाजाच्या हक्कांसाठी राज्यभर जनजागृती आणि आंदोलनाची दिशा कायम ठेवली जाईल, असा निर्धारही मोर्चादरम्यान व्यक्त करण्यात आला. मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. सदरील मोर्चा हा मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरु झाला. त्यानंतर मोर्चा हा गांधी चमन, शनिमंदीर मार्गे अंबड चौफुली येथे पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेमध्ये झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. पोलिसांनी बंदोबस्त ठेवत मोर्चा शांततेत पार पाडला. यावेळी प्रास्ताविक डॉ. सुशील सूर्यवंशी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रभाकर घेवंदे यांनी तर आभार हरीश रत्नपारखे, राहुल रत्नपारखे यांनी केले. ———– जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही जाहीर पाठिंबा यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांन त्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही जाहीर पाठिंबा व्यक्त केला. आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. टीईटी, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचे प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे ते म्हणाले. अशा गंभीर घटनांची नैतिक जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारून तातडीने राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श सत्ताधार्‍यांनी डोळ्यांसमोर ठेवावा, असे सांगितले. जबाबदारी स्वीकारण्याची परंपरा लोकशाहीत महत्त्वाची असून सत्तेवर राहण्यापेक्षा नैतिकतेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे