महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2026 मसुद्यावर हरकती व सूचनाची मागणी
जालना/प्रतिनिधी,दि.5
राज्य शासनाने कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम, 2026’ या नवीन नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. केंद्र शासनाच्या ‘औद्योगिक संबंध संहिता, 2020’ आणि ‘वेतन संहिता, 2019’ यांच्या धर्तीवर ही नियमावली तयार केली आहे. ही मसुदा नियमावली महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच कामगार विभागाच्या संकेतस्थळावर ‘कायदा व नियम’ (अॅक्ट अँड रुल्स) या विभागात सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आणि कामगार संघटनांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य शासनाने या मसुद्यावर संबंधितांकडून हरकती व सूचना मागविल्या असून इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा कामगार संघटनांनी आपली मते विहित कालावधीत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर हरकती व सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 या पत्त्यावर किंवा mh.labourcodes.rules@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत. राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापना आणि कामगार संघटनांनी या संधीचा लाभ घेत नियम अधिक सक्षम आणि समतोल करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.




