पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : 2 लाखांपर्यंत कर्जमाफी व 50 हजार प्रोत्साहन
जालना, दि.1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : 2 लाखांपर्यंत कर्जमाफी व 50 हजार प्रोत्साहन
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. याशिवाय, नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना वेळेवर पीककर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाची योजना लागू केली आहे. या लेखात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची पात्रता, कर्जमाफीच्या अटी, OTS योजनेचा लाभ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ तसेच इतर महत्त्वाची माहिती सविस्तर जाणून घेऊया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजे काय ? ही योजना राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास वाढवणे आणि नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन देणे हा देखील या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. योजनेची प्रमुख उद्दिष्टे • पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे. • शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. • कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे. • बँकिंग व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे. • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांपर्यंत कर्जमाफी ? या योजनेचा लाभ खालील अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. • 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेले असावे. • संबंधित कर्जाची थकबाकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत बाकी असावी. • 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड झालेली नसावी. वरील अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच या योजने मध्ये जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवलेली नाही. तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. OTS (One Time Settlement) योजनेचा लाभ कोणाला मिळेल ? ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांना प्रथम अतिरिक्त थकबाकीची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी लागेल. त्यानंतर त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.यासाठी शासनाने 31 मार्च 2027 पर्यंत मुदत निश्चित केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा राज्य शासनाने नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत घेतलेले पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये • पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. • जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट नाही. • पुनर्गठित कर्जांचाही समावेश. • OTS योजनेद्वारे अतिरिक्त थकबाकी भरल्यानंतर कर्जमाफीचा लाभ. • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा आहे. तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उत्साहाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. अरुण सुर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी जालना


