अत्याचार पीडित मृत व्यक्तीच्या पात्र वारसांना शासकीय/निमशासकीय सेवेत नोकरीसाठी 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.18
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत दाखल खून अथवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय/निमशासकीय सेवेत नोकरी देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दि. 20 नोव्हेंबर 2025 अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे.
सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार, शासन निर्णय लागू होण्यापूर्वी घडलेल्या प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाने नोकरी मिळण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार, अशा प्रकरणांतील पात्र वारसांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांच्यामार्फत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
तसेच, शासन निर्णयानुसार पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत संबंधित पात्र वारसाने अर्ज करणे आवश्यक असून, पात्र वारस अज्ञान असल्यास तो सज्ञान झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांच्या आत अर्ज सादर करू शकतो. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही. नोकरीसाठी अर्जाचा नमुना शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील.
तरी, शासन निर्णय लागू होण्यापूर्वी घडलेल्या संबंधित प्रकरणांतील पात्र वारसांनी अर्ज सादर करण्यास विलंब न करता दिनांक 20 नोव्हेंबर 2026 पूर्वी किंवा त्या दिवसापर्यंत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
