मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन कक्ष
जालना/प्रतिनिधी,दि.27
मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे व पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
हेल्पलाइन कक्षासाठी नव्याने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे, तसेच महसूल सहाय्यक संदिप इंगळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे..
नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेल्या पुराव्यांची माहिती उपलब्ध करून देणे, अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणे, उपलब्ध अभिलेखांमधून आवश्यक नोंदी शोधण्यास मदत करणे तसेच अर्जदारांच्या अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण हेल्पलाइन कक्षामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः उपलब्ध अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा किंवा कुणबी जातीच्या नोंदी आढळल्यास त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना केले जाणार आहे. तसेच संबंधित नोंदी व पुराव्यांच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हेल्पलाइन कक्षात उपस्थित राहून, नागरिकांकडून कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, उपलब्ध अभिलेखांची नोंद घेणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे तसेच सेवे संबंधी बाबींमध्ये आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करणार आहेत. तसेच हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या शंका व अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण करून, आवश्यकतेनुसार संबंधित विभाग/अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात माहिती, मार्गदर्शन अथवा अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.
****


