जालन्यात महावितरणच्या ओव्हरलोडिंगमुळे ग्राहक हैराण; सबस्टेशनच्या विस्तारीकरणासाठी नायब तहसीलदारांना निवेदन

जालना/प्रतिनिधी,दि.25
जालना शहरातील महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना दररोज दर पाच मिनिटाला वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार तायडे यांना एक सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनात जालना शहरातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे सांगत यंत्रणेच्या विस्तारीकरणाची आणि नवीन उपकेंद्रांची मागणी करण्यात आली आहे. जालना शहरातील एम.आय.डी.सी. 132 केव्ही केंद्रातून मोतीबाग आणि सर्वे क्र. 488 येथील 33 केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, सर्वे क्र. 488 मधील उपकेंद्रावर 11 केव्हीचे 13 फिडर, 2 ग्रामीण फिडर आणि 1 गावठाण फिडर असे एकूण 16 फिडर कार्यरत आहेत. तसेच मोतीबाग उपकेंद्रावर 11 केव्हीचे 4 फिडर आहेत. या अतिरिक्त भारामुळे 132 केव्ही मुख्य स्टेशनमधून वीज पुरवठा ओव्हरलोड होतो आणि फिडर ट्रिप होतात. सर्वे क्र. 488 उपकेंद्रामध्ये 10 एमव्हीएचे दोन आणि 5 एमव्हीएचा एक असे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. येथून जोडलेले राममंदिर, सॅटेलाईट, समर्थ नगर, टीव्ही सेंटर, योगेश नगर, मेडिकल कॉम्प्लेक्स, मेडिकल एक्सप्रेस, रेल्वे एक्सप्रेस, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर बंगलो, तसेच कृषी वाहिनी-2 मधील दरेगाव, सिरसवाडी, पिरपिंपळगाव हे फिडर सतत ट्रिप होत आहेत. मोतीबाग केंद्रांतर्गत येणारे गोकुळनगरी, दुःखी नगर, बचत भवन, शनी मंदिर हे फिडर आणि इंदेवाडी, अंतरवाला, सामनगाव, लक्ष्मीकांत नगर हे फिडरही ओव्हरलोडिंगच्या समस्येने ग्रासले आहेत. 300 कोटींच्या निधीच्या वापरावरून प्रश्नचिन्ह शासनाने आणि ऊर्जा मंत्र्यांनी शहराच्या वीज व्यवस्थेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, मूळ सिस्टीमच ओव्हरलोड असल्याने या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक न करता इकडे-तिकडे उधळपट्टी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जुन्या झालेल्या एच.टी. आणि एल.टी. लाईनच्या तारांमुळेही तांत्रिक बिघाड वाढले आहेत. सर्वे क्र. 488 मधील 33 केव्ही उपकेंद्राचे तातडीने 132 केव्ही केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव मागवून मंजुरी द्यावी, ओव्हरलोड फिडरचे विभाजन करून सिरसवाडी येथे नवीन 33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात यावे, 132 केव्ही सबस्टेशनसाठी सर्वे क्र. 488 मध्ये आणि सिरसवाडी येथे 33 केव्ही उपकेंद्रासाठी गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी, अत्यंत जुन्या झालेल्या एच.टी. व एल.टी. वीज तारा बदलण्यात याव्यात आदि मागण्यांचा समावेश आहे. वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, वकील, डॉक्टर आणि शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प होत आहे. या समस्येची मायबाप सरकारने दखल घेऊन संबंधित विभागांना त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदक बाबासाहेब वानखेडे यांच्यासह निलेश वानखेडे, सुमित्रा ढगे, अॅड. योगेश गाडगे, गोकुळ स्वामी, सरपंच प्रशासक एस.आर. ढगे, इंजि. शाम जाधव, मच्छिंद्र वाहुळकर, भगवान बट्टुहकर, सुभाष गाडगे, हर्षवर्धन रामदास, सदानंद हिवाळे, विनोद पानसरे, श्रीमंत बनसोडे, चंदन वाहुळकर, लिंबाजी ठोंबरे, हरिष वाहुळकर, अनिल भकाजी, सतीश वाहुळकर, दिलीप हिवाळे, यांच्यासह अनेकांनी केली आहे.



