सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याखयानमाला पुष्प सहावे…. व्याख्याते प्रा.बी.बी.चव्हाण…

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9
येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे सहावे पुष्प अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के होते तर प्रमुख वक्ते प्रा.बी.बी.चव्हाण या प्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते प्रा. बी.बी.चव्हाण यांनी भारताची फाळणी या विषयावर आपले मत व्यक्त केले.यावेळी बोलतांना ते म्हणाले की 1940 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी थाॅट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिले त्या काळात फाळणीचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील होता. तरीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तटस्थपणे आणि पुराव्यासह या पुस्तकाचे लेखन केले आहे. बाबासाहेबांनी या पुस्तकात मुस्लिम लीगची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी का आहे ? आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच भविष्यात भारताच्या सुरक्षिततेवर त्याचा काय परिणाम होईल याचे विवेचन केले आहे. तसेच फाळणीवरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला तर काय घटनात्मक उपाय असू शकतात हे देखील सांगितले आहे . यावरून फाळणीच्या संदर्भात बाबासाहेबांची दूरदृष्टी समजून घेणे महत्त्वाचे मानले जाते. भारताच्या फाळणी विषयी बोलताना प्रा.चव्हाण म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आपण आपापसातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी एकत्र काम केले पाहिजे असे बाबासाहेबांचे मत होते. परंतु त्यावेळेचे काँग्रेस नेतृत्व यांनी येतबाबासाहेबांच्या मताला पाहिजे तेवढा प्रतिसाद दिला नाही आणि बॅरिस्टर जिना यांना पाकिस्तान रुपी स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याकारणाने अपरिहार्यकारणानेच भारताची फाळणी झाली . त्याची खूप मोठी किंमत आजही आपण मोजत असल्याचे सांगितले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले मुस्लिम राजवटीमध्ये त्या त्या प्रांतावर कब्जा करून राज्य केले जात होते परंतु इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देताना मुस्लिमांना स्वतंत्र देशाची आशा निर्माण व्हावी यासाठी वातावरण निर्माण केले. म्हणून मुस्लिम लीग सारख्या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करून घेतली परंतु आज पाकिस्तान हा कट्टर मुस्लिम राष्ट्र म्हणून जगासमोर आहे आणि भारत मात्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपली प्रगतीची घोडदौड करत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,महाविद्यालयातील प्रसिद्ध समितीचे प्रमुख प्रा.अनिल वैद्य,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.एम.पाटील यांनी केले तर आभार डॉ.जितेंद्र वाघ यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.




