जन्मदिनानिमित्त माजी प्राचार्य मधुकर निकम सरांकडून गुरुकुल विद्या मंदिर शाळेच्या वाचनालयास ३१ हजारांची मदत..

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.20
टेंभुर्णी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच संदर्भग्रंथ, कथा, कादंबऱ्या व इतर दर्जेदार पुस्तकांचे वाचन होणे अत्यंत गरजेचे आहे. वाचनसंस्कृती जोपासल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती आणि दृष्टिकोन समृद्ध होतो, असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्री. मधुकर निकम सर यांनी केले. ते येथील गुरुकुल विद्यामंदिर शाळेच्या वाचनालयासाठी मदत प्रदान करताना बोलत होते.
आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी प्राचार्य श्री. मधुकर निकम सर यांनी गुरुकुल विद्यामंदिरच्या वाचनालयातील पुस्तकांसाठी तब्बल ३१,००० रुपयांची (एकतीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली. ज्ञानदानाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वाचन कक्षात भर पडावी, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेचे प्राचार्य श्री. विजय सातभाई यांनी ही मदत स्वीकारून निकम सरांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच वाचनालयाच्या समृद्धीसाठी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी सरांचे विशेष आभार मानले. या उपक्रमाचे शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे..


