खानापूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!
डॉ. आत्माराम फकिरबा शेळके यांच्या सह-संपादनाखाली Springer Nature कडून महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित; गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद कामगिरी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
ग्रामीण भागातून पुढे येत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे खानापूर येथील रहिवासी तथा सध्या पुणे येथे कार्यरत असलेले डॉ. आत्माराम फकिरबा शेळके यांनी आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या सह-संपादनाखाली (Co-Editor) आणि लेखनातील योगदानातून ‘आरोग्यसेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि रुग्णांची सुरक्षितता’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही बाब खानापूर गावासह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे.
जगातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांपैकी एक असलेल्या Springer Nature या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भारतासह युरोपमधील नामवंत प्राध्यापक, संशोधक, संपादक आणि लेखकांचे योगदान या पुस्तकाला लाभले आहे. त्यामुळे या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
डॉ. आत्माराम शेळके हे पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा कायदा, सायबर कायदा, घटनात्मक कायदा आणि प्रशासकीय कायदा या विषयांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या नावावर ४० हून अधिक संशोधनपर प्रकाशने असून त्यांना अध्यापन क्षेत्रातील १७ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
सध्याच्या आधुनिक युगात आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग, रुग्णांची गोपनीयता, वैद्यकीय माहितीची सुरक्षितता, कायदेशीर बाबी आणि रुग्णांचे अधिकार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा या पुस्तकात ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स, वैद्यकीय तज्ज्ञ, कायदे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
खानापूरसारख्या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले असताना पुण्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत जागतिक दर्जाच्या प्रकाशन संस्थेच्या पुस्तकात सह-संपादक आणि लेखक म्हणून स्थान मिळविणे ही गावासाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे. डॉ. आत्माराम शेळके यांच्या या यशामुळे खानापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचे खानापूरसह जाफराबाद तालुक्यातून कौतुक होत आहे.
ग्रामीण मातीतून जागतिक ज्ञानविश्वापर्यंत मजल मारणाऱ्या डॉ. आत्माराम फकिरबा शेळके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खानापूर ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




