जाफ्राबादमध्ये थरारक घटना; मिरची व्यापारी शेख मोहसीन यांची हत्या
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27
जाफ्राबाद तालुक्यातील चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात मंगळवारी (दि. २७ मे) मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. बुलेट चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मजीद (वय ४६) यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अंदाजे १ ते २ वाजेच्या दरम्यान चोरी करून पसार होत असलेल्या आरोपींना अडवण्याचा प्रयत्न शेख मोहसीन यांनी केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर सपासप वार करत रक्तरंजित हल्ला चढवला. डोके, मान, पाठ आणि दंडावर करण्यात आलेल्या तब्बल सात वारांमुळे ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा पुतण्या शेख साहिल हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहेत. या निघृण हत्येमुळे जाफ्राबाद शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मयत शेख मोहसीन हे न्यू हायस्कूलचे शिक्षक शेख मोबिन सर यांचे लहान बंधू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे जाफ्राबाद तालुक्यावर शोककळा पसरली असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


