स्थानिक गुन्हे शाखेची वाळू-गुटख्यासोबत गंभीर गुन्ह्यांवरही कारवाई
जालना/प्रतिनिधी,दि.18
जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी व प्रतिबंधित गुटख्याविरोधातील कारवाईसोबतच दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही कार्यवाही करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) खुलासा केला आहे.
एलसीबीच्या खुलाशानुसार, जालना जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी तसेच प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार संबंधितांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात आली. मात्र, एलसीबीचे संपूर्ण लक्ष केवळ वाळू व गुटखा कारवाईवर असल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, दरोड्याचे २ गुन्हे दाखल असून दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या प्रकरणांत ११ आरोपींना अटक करण्यात आली. जबरी चोरीचे २६ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी २४ गुन्हे उघडकीस आले आहेत, तर ४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. घरफोडीचे ७० गुन्हे दाखल असून २० गुन्ह्यांची उकल झाली असून ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे चोरीचे ६२४ गुन्हे दाखल असून ३०५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या प्रकरणांत ३६१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती खुलाशात देण्यात आली आहे. खुनाचे ३० गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी २८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासाबाबतीत पोलिस विभाग गांभिर्याने काम करत आहे.
अवैध वाळू वाहतूक व तस्करीविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. वाळू चोरीचे १८७ गुन्हे दाखल झाले असून सर्व १८७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईत ३३१ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच प्रतिबंधित गुटख्याशी संबंधित ७८ गुन्हे दाखल असून सर्व ७८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत आणि ६९ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
या आकडेवारीवरून स्थानिक गुन्हे शाखेकडून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर समांतरपणे तपास व कारवाई सुरू असल्याचे दिसून येते. विशेषतः वाळू चोरी व गुटखा प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गंभीर गुन्ह्यांमध्येही दरोडा व खुनाच्या गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणावर उकल करण्यात आली असून चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतही आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध, अटक आणि गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्पष्ट केले आहे.

