जालन्यात डिजिटल स्व-गणना मोहिमेला वेग जिल्ह्यातील 5 गावांत 100 टक्के नोंदणी पूर्ण; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जालना/प्रतिनिधी,दि.13
भारत सरकारच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या जनगणना 2027 अंतर्गत डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) मोहिमेला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांनी शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. केंद्र सरकारच्या जनगणना विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या स्व-गणना करण्याची सुविधा मिळाली असून जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायत यंत्रणा यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर जनजागृती मोहिमा, विशेष शिबिरे आणि ऑनलाइन सहाय्य केंद्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांनी अल्पावधीत शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करत आदर्श निर्माण केला आहे. भोकरदन तालुक्यातील मोहदरी या गावाने विशेष कामगिरी करत गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण केली आहे. गावातील एकूण 80 कुटुंबांपैकी सर्वांनी ऑनलाइन नोंदणी केली असून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच हातडी या गावातील 62 कुटुंबांनीही स्व-गणना पूर्ण केली आहे. या दोन्ही गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी घरभेटी देत नागरिकांना ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती दिली. याशिवाय जाफ्राबाद तालुक्यातील डोंगरगाव येथेही स्व-गणना मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गावातील सर्व कुटुंबांनी ऑनलाइन माध्यमातून माहिती नोंदवून मोहिम यशस्वी केली आहे. बदनापूर तालुक्यातील मंठा येथील 168 घरांपैकी 100 घरांनी स्व-गणना पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली. या भागात तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि जनगणना कर्मचारी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मोहिमेबाबत जनजागृती केली. जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी प्रचार आणि प्रबोधन मोहीम राबवली जात असून नागरिकांना डिजिटल स्व-गणनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. जनगणना प्रक्रियेमध्ये नागरिकांचा थेट सहभाग वाढविणे, माहिती संकलन अधिक अचूक करणे आणि वेळेची बचत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी आल्यास टोल फ्री क्रमांक 1855 वर संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्व-गणना मोहिमेस केवळ दोन दिवसाचा कालावधी राहिला असुन, या दोन दिवसात जिल्ह्यातील गावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवून शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून डिजिटल भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



