कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.28
राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सर्व आस्थापना मालकांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन केले आहे. कामगार व मजूर विविध क्षेत्रांत काम करत असताना उष्णतेच्या लाटेचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत, राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, बांधकाम स्थळे, हॉटेल, व्यापारी आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि इतर संस्थांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी खालील उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत : · कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. · कामाच्या ठिकाणी सावलीची किंवा विश्रांतीची जागा उपलब्ध करून द्यावी. · दुपारी 12 ते 4 या वेळेत उघड्यावर काम टाळावे; आवश्यक असल्यास कामाच्या वेळांत बदल करावा. · उष्माघात व उष्णतेच्या परिणामांविषयी जनजागृती करावी. · प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. · या कालावधीत जड शारीरिक श्रम टाळण्याचे निर्देश द्यावेत. · बांधकाम व इतर श्रमिक कामांमध्ये आवश्यक त्या सुविधा, जसे की आईस पॅक व थंडावा देणारी साधने उपलब्ध करावीत. · कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाशी समन्वय साधावा. · उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन करावे. · कामाच्या ठिकाणी सूचना फलक, पोस्टर्स व आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्व आस्थापनांची जबाबदारी आहे. सर्व संबंधितांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी केले आहे.




