pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद तालुका बंदच्या हाकेला भरभरून प्रतिसाद; शहरात दिवसभर शुकशुकाट

व्यापारी महासंघासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो समाजबांधवांची उपस्थिती..

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

जाफराबाद,येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जाफराबाद तालुका बंदला गुरुवारी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. जाफराबाद शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरातील वातावरणात मोठा बदल जाणवत होता. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने बंद होती. नेहमी नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असणाऱ्या मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महाराणा प्रताप चौक परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसून आला. बाजारपेठेतील प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याने बंदचा परिणाम संपूर्ण शहरात स्पष्टपणे जाणवत होता.
जाफराबाद शहरातील व्यापारी महासंघानेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली. तर मुस्लिम समाज बांधवांसह
विविध व्यापारी आणि व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला. व्यापाऱ्यांच्या या सहभागामुळे बंदला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. तालुक्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी चौकात झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आपली भूमिका मांडली. “आमची मागणी आरक्षणाची आहे, भांडणाची नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सभेदरम्यान “एक मराठा, लाख मराठा”, “जय शिवराय” अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला. उपस्थित तरुण आणि समाजबांधवांनी एकजुटीचे प्रदर्शन करत मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिक स्वयंस्फूर्तीने जाफराबाद शहरात दाखल झाल्याने बंदच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बंददरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णालये, मेडिकल, दूध वितरण तसेच वृत्तपत्र वितरण सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्यात कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली नाही.
बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जाफराबाद पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. बंद शांततेच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद यशस्वी झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला.
बंद यशस्वी झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला लढा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांचा पुढील आदेश मिळेपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी शांततामय मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार, अशी भूमिका यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केली.
जाफराबाद तालुका बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शहरातील सर्व व्यापारी बांधव, वाहतूकदार, पत्रकार, पोलीस प्रशासन तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिकांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत बंदला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या एकजुटीचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे