अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने दिला 7 हजार 478 तरुणांना हक्काचा स्वयंरोजगार
जालना/प्रतिनिधी,दि.17
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जालना जिल्ह्यात मोठी कामगिरी बजावली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 478 तरुणांना हक्काचा स्वयंरोजगार मिळाला असून, त्यांच्या उद्योगांना गती देण्यासाठी महामंडळाकडून आतापर्यंत 61.62 कोटी रुपयांचा व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात बेरोजगारीवर मात करून तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी या योजनेचा प्रभावी वापर झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यात विविध बँकांच्या माध्यमातून 1911 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्जामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो तरुणांना आपला हक्काचा व्यवसाय सुरू करता आला आहे. वर्षनिहाय लाभार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे. • २०१८-१९ : १५३ • २०१९-२० : ५८८ • २०२०-२१ : ६४२ • २०२१-२२ : ९४७ • २०२२-२३ : ६१६ • २०२३-२४ : ६९३ • २०२४-२५ : १५०१ • २०२५-२६ : ३००० अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 1911 कोटींच्या कर्जवाटपामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या असून, तरुणांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने आता आपली संपूर्ण कार्यपद्धती डिजिटल केली आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया आणि व्याज परताव्यासाठी तरुणांना आता शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. पारदर्शकता आणि वेग वाढवण्यासाठी महामंडळाने तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याने लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमेश्वर शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.




